लोणी काळभोर : प्लॉट दाखविण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना कोलवडी (ता. हवेली) परिसरात गुरुवारी (ता. १) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात ६ महिलांसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी खराडीतील एका ३३ वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सहभागीदारीमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. फिर्यादी व त्यांचे सहभागीदार या सर्वांनी मिळून मौजे कोलवडी गाव येथील गट नं. ११५५ या ठिकाणचे ० हे ४१ आर हे क्षेत्र विकत घेतले होते. या क्षेत्राचे दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रं. ११ या ठिकाणी १९ जानेवारी २०२४ रोजी खरेदीखत झाले होते. या जागेचे खरेदीखताचे दस्त झाल्यानंतर फिर्यादी व सहभागीदार यांनी संबंधिचे क्षेत्र विकसीत करुन सर्वांनी मिळून, त्याठिकाणी प्लॉटींगचा व्यवसाय सुरु केला.
कोलवडी गाव येथील गट नं. ११५५ या ठिकाणी एकूण २० गुंठे क्षेत्र असून, त्यापैकी ४ गुंठे जागेची विक्री केली आहे. उर्वरीत १६ गुंठे विक्रीसाठी शिल्लक आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्रास घेऊन विक्रीसाठी असलेला प्लॉट दाखविण्यासाठी गेले असताना, आरोपींनी त्याठिकाणी गैर-कायदा मंडळी जमविली होती. त्यातील एका अनोळखी पुरुषाने फिर्यादी यांना बंदुकीचा धाक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली.
दरम्यान, आरोपींनी संबंधित ठिकाणी दंगा करुन फिर्यादी यांच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले. तसेच या जागेमध्ये परत यायचे नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देवून, शिवीगाळी व दमदाटी केली, अशी फिर्यादी त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव करीत आहेत.