पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी एका तरुणाने दिली आहे. याप्रकरणी एका तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. वैभव तुकाराम कर्णिक (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कात्रज भागातील दत्तनगर परिसरात राहायला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्णिक तिला त्रास देत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असं सतत म्हणत होता. तसेच प्रेमास नकार दिलं तर चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी त्याने तिला दिली होती. तरुणी महाविद्यालयात निघाल्यानंतर तो तिचा पाठलाग देखील करायचा.
समाजमाध्यमात तरुणीचे छायाचित्र वापरुन त्याने तिची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने पोलीस स्टेशन गाठले. कर्णिकच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे करत आहेत.