डोर्लेवाडी, (पुणे) : मागील तीन वर्षापासून बंद असलेल्या पाटाची स्वच्छता न करताच इरिगेशन खात्याने प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने हजारो लिटर पाणी पाट, पाणंदीतून वाया जात आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त पाटबंधारे विभाग करणार का? अशी विचारणा परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
एकीकडे उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणवत असल्याने तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई आहे. काही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळेना आणि इथे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे प्रशासनाचा गाफीलपणा समोर आला आहे. केवळ कर्मचाऱ्यांच्या गाफीलपणांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने नागरिकांकडून कारवाईची मागणी होत आहे.
एकीकडे दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करून तहान भागवावी लागत आहे, तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्याचा अपव्यय सुरू आहे. पाटाची स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आले. तीन वर्ष पाटात साचलेली घाण यामुळे हा पाट बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाटात न बसलेले पाणी पाटाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसले आहे. त्याबाबत येथील लोकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अनावश्यक पाणी शेतात तुंबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देणार का? अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.
इरिगेशन खात्याच्या गलथान कारभारामुळे सर्व ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच संतापले असून संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करू लागले आहेत. पाणीसंकट असतानाही केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारांमुळे अनेकवेळा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारच्या चुका थांबविल्यास आपोआप पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना झरे, विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशी परिस्थिती असताना पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या थेंबाचे गांभीर्य पाटबंधारेच्या लक्षात कधी येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इरिगेशन पाटातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र, हा पाट गावठाणातुन जात असल्याने ग्रामस्थांनी यामध्ये कचरा टाकला आहे. त्यामुळे या पाटाच्या नळ्या जाम झाल्या आहेत. त्यामुळे हे पाणी पाटाच्या बाहेर पडून नागरिकांच्या दारात गेले. ही बाब लक्षात येताच इरिगेशन खात्याने लगेच पाणी बंद केले. हा इरिगेशनचा पाट 130 वर्षांपूर्वीचा आहे. परंतु, नागरिकांनी त्यावर अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. तरी यापुढे नागरिकांनी इरिगेशनचे अंतर सोडून घरे बांधावीत हि विनंती.
निवृत्ती नेवसे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज पाणी वापर संस्था, डोर्लेवाडी, ता. बारामती