पुणे : गणेश मंडळांनी एकत्र मिरवणूक काढावी, यासाठी पुणे पोलिसांनी दिलेल्या आवाहनाला ९ गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. या ९ मंडळांनी राज्यातील गणेश मंडळासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
या मंडळांच्या माध्यमातून देशातील पहिल्या सर्वात मोठ्या एकत्रित सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.३१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निघणाऱ्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन मोहननगर मित्रमंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध येवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्यांचा’ या उक्तीप्रमाणे पुणे शहरातील नऊ सार्वजनिक गणेश मंडळे एकत्रित येऊन नवा आदर्श निर्माण करणार आहेत. यामुळे मिरवणुकीतील ट्रॉली एकच राहणार असून दीड लाख रुपयांत सर्व मंडळाची मिरवणूक होणार आहे. दरम्यान, या उपक्रमाचे पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक केले असून असे उपक्रम राबवावेत असे म्हटले.
पोलिस विभागाने केलेल्या आवाहनाचा प्रतिसाद देत धनकवडी परिसरातील नऊ गणेश मंडळे एकता मित्रमंडळ, केशव मित्रमंडळ, पंचरलेश्वर, अखिल नरवीर तानाजीनगर, जय महाराष्ट्र, फाइव्ह स्टार मित्रमंडळ, विद्यानगरी, रामकृष्ण मित्रमंडळ आणि अखिल मोहननगर मित्रमंडळांच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन हा नवा पायंडा सुरू केला आहे.