उरुळी कांचन (पुणे) : शिरूर मतदारसंघातील उरुळी कांचनसह परिसरातील मतदार केंद्रावर सोमवारी (ता. 13) सकाळी उत्साहात मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. दुपारी मतदान केंद्रावरची गर्दी थोडीशी कमी झाली.
सकाळी अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने बऱ्याच जणांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले. सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे २० टक्के एवढे मतदान झाले. तर दुपारी 1 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
मतदार केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोलीत मतदारांना पंखा, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवण, चहाची सोय देखील करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत सुरु असून मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर तसेच परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार दुपारपर्यंत घडला नव्हता.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेसाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक सीआरपीएफची पथके तैनात केली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपायोजना करण्यात आलेल्या आहेत.