उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदान (बाजार मंडई) परिसरातून महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात सोनसाखळी चोरांनी पळवल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
बेबी बाळासाहेब संकर (वय- 53, रा. पाटील वस्ती, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या समोर, उरुळी कांचन ता. हवेली) असे मंगळसूत्र पळवून गेलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेबी संकर या एका पतसंस्थेत पिग्मी गोळा करतात. रोजच्याप्रमाणे पिग्मी गोळा करीत असताना बाजार पेठ मैदानात पिग्मी गोळा करीत असताना अचानक नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर दोघेजण आले. त्यांनी बेबी संकर यांना हेरले व त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पळवून नेले.
दरम्यान, अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली असल्याने त्या परिसरातील काही तरुणांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठीमागे बसलेल्या एका अज्ञाताने त्या ठिकाणी असलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवला व तुपे वाटी परिसरात पळून गेले.
उरुळी कांचन परिसरात सीसीटीव्हीचा अभाव
ज्या ठिकाणी चोरी झाली त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची सोय नाही. सोने चांदीचे भाव गगनाला भिडल्याने महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय हे चोर हातात कोयत्यासारखी हत्यारे घेऊन दुचाकी वर फिरत असल्यामुळे दहशत वाढली आहे.
दरम्यान, सदर घटना घडून दोन तास होत आले मात्र अद्याप उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.