हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, नायगाव, बिवरी परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी मागील सहा महिन्यात तब्बल १७ विद्युत रोहित्र फोडून, रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी लोकवस्तीपासून दूर असणाऱ्या विद्युत रोहीत्रांना टार्गेट केले असून, यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी हतबल दिसून आहे. तर दुसरीकडे नदी, कालव्यातून मुबलक प्रमाणात पाणी वाहत असूनही चोरट्यांच्या करामतीमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विद्युत रोहित्र निर्जन ठिकाणी असल्याने ते बसवले की लगेच फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केली जात आहे.
कोरेगाव मूळ परिसरातील तांबे वस्ती येथील रोहित्र बसवले की तिसऱ्या दिवशी चोरून नेल्याची ताजी घटना घडली आहे. अजूनही पूर्व हवेलीत विद्युत रोहित्र चोरीचा सपाटा सुरू असल्याने यामागचा मुख्य सूत्रधार शोधण्याचे आव्हान लोणी काळभोर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये म्हणून रोहित्राला महावितरण विभागाच्या वतीने वेल्डिंग करण्यात येत आहे. परंतु, आता चक्क चोरटे वेल्डिंग तोडून विद्युत रोहित्र चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.
जीवाशी खेळ करत धाडसी चोरी…
थ्री फेज वीजपुरवठा सुरु असताना रोहित्राची चोरी करणे म्हणजे मृत्यूशी खेळ करण्यासारखे आहे. परंतु, चोरटे हे काम अतिशय खुबीने करत आहेत. यामुळे हे चोरटे निश्चितच विद्युत कामासंदर्भात प्रशिक्षित असावेत. रोहित्र चोरी केल्यानंतर तांबेची तार, इन्सुलेटीव्ह ऑइल चोरीस जात आहे. एका डिपीमधील ऑइल आणि धातूची किंमत अंदाजे दीड ते २ लाखापर्यंत असते.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
विद्युत रोहित्र नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या शेतीमध्ये ऊस, रब्बी पिके, कांदा, भाजीपाला, यासारखी नगदी पिके आहेत. हिवाळ्याचे असले तरी मोठ्या प्रमाणात ऊन पडत आहे. त्यामुळे पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवण्याची गरज असते. तसेच पाण्याची कमतरता जाणवल्यास फळशेतीचे नुकसन होऊन शेतकऱ्याचे वर्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता असून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणी असूनही देता येत नाही शेतीसाठी
रोहित्र चोरीला जात असल्याने वीजपुरवठा खंडीत होतो. यामुळे पूर्व हवेलीतील बळीराजा हा खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. वारंवार रोहित्र चोरीच्या व अखंडित लाईटची सोय नसल्याने पाणी असून, शेतीसाठी पाणी देता येत नाही. मागील पंधरा दिवसात आमच्या परिसरातील रोहित्र चोरून नेले आहे. तसेच घरची १०० फुट बोअरमधील मोटर चोरून नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, जमिनीत अडकल्याने ती वाचली आहे.
– बाळासाहेब चौरे, प्रगतशील शेतकरी, टिळेकरवाडी, हवेली
पूर्व हवेलीतील शेतकरी सततच्या चोरीमुळे हैराण
पूर्व हवेलीतील मुळा मुठा काठावरील शेतकरी ट्रान्सफॉर्मर चोरी, केबल चोरी, मोटार चोरी, पिकांच्या चोरी अशा गोष्टींना शेतकरी हैराण झाला आहे. तरी शासनाने व पोलीस खात्याने त्वरित त्याकडे लक्ष देऊन अशा गुन्हेगारांना धडा शिकवावा.
– पोपट साठे, शेतकरी, भवरापुर, हवेली
लोणी काळभोर पोलिसांना गस्त वाढण्याचे पत्र लवकरच देणार
मागील सहा महिन्याच्या काळात सतरा रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी झाली ही बाब खरी आहे. या तारांच्या चोरीमुळे महावितरणाचे १० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. रोहित्र बसवताना वेल्डिंग करून बसवत आहोत. मात्र, रात्रीच्या वेळी तीन फेज लाईट गेल्यानंतर हे रोहित्र चोरीला जात आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांना गस्त वाढण्याचे पत्र लवकरच देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने विद्युत रोहित्र त्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
– धम्मपाल पंडित, उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन, हवेली