कोरेगाव भिमा: कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे विद्यार्थ्याच्या लग्नावरून घरी परत निघालेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील एक तोळ्यांचे मिनी गंठण आणि आठ तोळ्यांचे मोठे गंठण जबरदस्तीने गळ्याला हिसका मारून चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अरुणा दिलीप पवार (वय ३९, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी माहितीनुसार अरुणा पवार या त्यांचे पती दिलीप पवार व मुलगा यांच्यासोबत विद्यार्थ्याच्या लग्नावरून घरी परतत असताना रात्री आठच्या सुमारास कोरेगाव भिमा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ आले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी शिक्षिकेच्या गळ्यातील मिनी गंठण आणि मोठे गंठण असा २,०६,००० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. चोरटयांनी हिसका मारल्याने दुचाकी रोडवर पडली. यामध्ये शिक्षिकेच्या कपाळाला तोंडाला, नाकाला, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. संबधित प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.