उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 15 दिवसांपासून उरुळी कांचन परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटे दिसूनही यातील एकाही चोरट्याला पकडण्यात उरुळी कांचन पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुरुवारी (ता. 15) रात्री तुपे वस्ती परिसरात काही नागरिकांच्या घराला अज्ञात चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या होत्या. तर एका अज्ञात चोराला एका नागरिकाने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताला झटका मारून शेजारी असलेल्या उसाच्या शेतात पळून जाण्यात चोर यशस्वी झाला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांची गस्ती कुचकामी ठरत असल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ ही अतिसंवेदनशील गावे आहेत. तथापी मागील पंधरा दिवसांपासून अज्ञात चोरट्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करताना दिवसरात्र गस्त वाढविली होती, परंतु या पोलीस गस्तीला हुलकावणी देत चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दहा दिवसांपूर्वी तुपे वस्ती परिसरातील एका आजीच्या समयसूचकतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला होता. तर डीझेल चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी पहाटे व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना घडल्यानंतरही ढिम्म पोलिस यंत्रणेला आव्हान देत चोरट्यांनी उरुळी कांचन व परिसरात पुन्हा डोके वर काढले आहे. तसेच चोरीच्या आजपर्यंत झालेल्या घटनांचा उलगडा उरुळी कांचन पोलिसांना झाला नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, ग्रामीण भागामध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. शेतकरी थंडीमुळे लवकर झोपत आहे. तसेच, रात्रीच्या वेळी घरातून बाहेर येत नसल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता असल्याची भावना निर्माण झाली आहे. तसेच बंद घराचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
याबाबत बोलताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन म्हणाले, “आम्ही राहत असलेल्या खेडेकर मळा, अयोध्या नगर, खेडेकर वस्ती परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. हे चोरटे रेकी करून चोरी करीत आहेत. शेजारी सर्वत्र शेतजमीन व त्यामध्ये ऊस असल्याने चोर याचा फायदा घेत आहेत. पोलिसांना माहिती दिली की पोलीस सीसीटीव्ही आहे का विचारणा करतात. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून भुरट्या चोरट्यांना अटक करावी.”
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.