हडपसर, (पुणे) : लोणी काळभोर, विश्रामबाग, हडपसरसह पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदारांसह घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ५ व ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
निहालसिंग मन्नुसिंग टाक उर्फ शिखलकर (वय १९ वर्षे, रा. स.नं. ४, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, वाहन चोरी असे एकूण ९ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून २ लाख ६८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेकडील युनिट ५ व ६ कडील अधिकारी व अंमलदार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. १२) गस्त घालत असताना पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर व नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, एक सराईत चोरटा त्याच्याकडे चोरीची दुचाकी असून, तो विविध ठिकाणांहून चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी चंदवाडी, फुरसुंगी या भागात येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, चंदवाडी रोडला असणारे दत्त मंदिराजवळ पोलीस पथक आले असता त्या ठिकाणी एक व्यक्ती दुचाकीवर संशयितरित्या जात असताना दिसला व पोलिसांनी त्याला दुचाकीसह मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत माहिती विचारली असता त्याने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले.
अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथीदारासह वानवडी व वडकी भागात दोन घरफोडी, चोरी केल्याचे सांगितले. तसेच पुणे शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरी, जबरी चोरी व वाहन चोरी असे एकूण ९ गुन्हे केल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण ४ दुचाकी, ४ मोबाईल फोन व विदेशी चलन असा एकूण २ लाख ६८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, दया शेगर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश ताकवणे, शेखर काटे, प्रतिक लाहीगुडे, पांडुरंग कांबळे, संजय दळवी, स्वाती गावडे यांनी केली.