लोणी काळभोर : पेरणे फाटा येथील शौर्यादिनाच्या पार्श्वभूमीवर कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा ते पेरणे फाटा (भीमा कोरेगाव) हा रस्ता रविवारी (ता. ३१) दुपारी दोन वाजल्यापासून पुढे तब्बल ३४ तास अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन लोणी काळभोर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांनी केले आहे.
थेऊर फाट्याकडून लोणी कंदच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून फक्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांच्या गाड्या व स्थानिक नागरिकांच्या घरगुती प्रवासी गाड्या जातीत. या मार्गावरील अवजड वाहनांसाठी बंद केलेली वाहतूक वळविण्यात आलेली आहे. ती हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून पुढे आळंदी व चाकणमार्गे पुढे जाईल.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी येतात, तसेच इतरही लाखोंच्या संख्येने लोक याठिकाणी येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग दिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने थेऊर फाटा ते पेरणे फाटा हा रस्ता रविवारी (ता. ३१) दुपारी दोन वाजल्यापासून सोमवारी (ता. १) रात्री १२ वाजेपर्यंत असा तब्बल ३४ तास अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे.
थेऊर फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी थेऊर फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, विकास जगदाळे, हवालदार, केतन धेंडे, राजेश दराडे व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, आनंद साळुंखे, ज्ञानोबा बडे, बापूराव बांगर व त्यांचे सहकारी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवत आहेत. लोणी काळभोर पोलिसांचा २० जणांचा ताफा व वाहतूक शाखेच्या २० पोलिसांचा ताफा थेऊर फाटा येथे दिवस व रात्रपाळी असे कर्तव्य बजावणार आहे.
लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ
कोरेगाव भीमा या ठिकाणी १ जानेवारी १८१८ मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार पलटनीच्या जोरावर इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो.