लोणी काळभोर, (पुणे) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या युवकांना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. केसनंद-थेऊर रस्त्यावर शनिवारी (ता. ०६) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अथर्व संतोष हेंद्रे (वय -१८, रा. श्रीनाथ अपार्टमेंट, बुधवार पेठ, फलटण, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या अपघातात अनिकेत सुनील जगदाळे, प्रेम पोळ, विवेक ताराळकर (तिघे रा. फलटण) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी ट्रकचालक संतोष शिवाजी नरळे (रा. बंडगर वस्ती, हबिसेवाडी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत आदित्य शंकरराव गायकवाड (वय 31, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथील शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान निमित्त शुक्रवारी मध्यरात्री वढू येथून ज्योत घेऊन 70 ते 80 कार्यकर्ते फलटण कडे निघाले होते. केसनंद-थेऊर रस्त्यावर आले असता त्यांना भरधाव ट्रकने दुचाकीस्वार तरुणांच्या गटाला जोरदार धडक दिली. अपघातात अथर्वच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अनिकेत जगदाळे, प्रेम पोळ, विवेक ताराळकर हे या अपघातात जखमी झाले.
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.