लोणी काळभोर: कुंजीरवाडी ( ता. हवेली ) ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त झालेले नसताना उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हवेली तालुक्याच्या पूर्व भागात यामुळे खळबळ उडाली असून राज्य सरकारच्या “शासन आपल्या दारी” ऐवजी “शासन मनमानी निर्णय करी” अशी म्हण प्रचलित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये कुंजीरवाडीच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल जाहीर झाला होता. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच अंजू गुलाब गायकवाड यांनी निर्धारीत वेळेत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्यामुळे पुढील सहा वर्षांसाठी त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व व त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, उपसरपंचपद रिक्त नसतानाही सरपंच पदाबरोबरच उपसरपंचपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या बाबतच्या नोटीसा ग्रामपंचायत सदस्यांना बजावण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुळातच मावळत्या उपसरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक ही सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होत असते. परंतु, असे असतानाही थेऊरच्या मंडलाधिकारी तथा अध्यासी अधिकारी जयश्री कवडे यांनी उपसरपंचपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा नवीन पराक्रम केला आहे.
रिक्त झालेल्या सरपंच पदासोबत रिक्त नसलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मंडल आधिकारी जयश्री कवडे यांचा भोंगळ कारभार अधोरेखित झाला आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नसतानाही उपसरपंचपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या “शासन आपल्या दारी” ऐवजी मंडल आधिकारी जयश्री कवडे यांनी केलेल्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे “शासन मनमानी निर्णय करी” असे म्हणण्याची वेळ पूर्व हवेलीतील नागरिकांवर आली आहे. या संदर्भात जयश्री कवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
उपसरपंच रिक्त नसताना व उपसरपंचपदाच्या निवडणूकीचा अधिकार मंडल अधिकाऱ्यांना नसतानाही त्यांनी बजावलेली नोटीस चुकीची आहे. रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या निवडणूकीच्या कार्यक्रमाची नोटीस पुन्हा नव्याने बजावण्यासाठी संबधिताना आदेश दिलेले आहेत.-
– किरण सुरवसे, तहसीलदार हवेली
थेऊरच्या मंडल आधिकारी जयश्री कवडे व त्यांच्या कार्यालयाच्या भोंगळ कारभाराबद्दल तसेच जमिनींच्या नोंदी संदर्भात परिसरातील नागरिकांच्यात प्रचंड नाराजी आहे. मंडल आधिकारी जयश्री कवडे यांनी उपसरपंच पद रिक्त झालेले नसतानाही या पदाची निवडणूक लावली आहे. अशी घटनाबाह्य निवडणूक जाहीर केल्याबद्दल त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
– सचिन तुपे ( माजी सरपंच कुंजीरवाडी )