पिंपरी : वंशाला दिवा नसल्याने पत्नीचा छळ करण्याचे प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही सुरू आहेत. पिंपरी परिसरात नुकतीच अशीच एक घटना घडली. पत्नीला सलग आठ मुली झाल्या पण वंशाला दिवा नसल्याने पती पत्नीचा अतोनात छळ करत होता. पतीच्या सततच्या छळामुळे त्रासलेल्या पत्नीने अखेर पतीलाच संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने अनेकदा प्रयत्न देखील केले. मात्र, प्रयत्नांना यश मिळत नसल्याने तिने चक्क सराईत गुन्हेगारांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली. मात्र, पत्नीचा हा प्लान देखील फसला आणि डाव तिच्यावरच उलटला.
याबाबत जखमी व्यक्तीच्या मुलीने निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्ह्यात सहभागी हल्लेखोर शिवम दुबे उर्फ दुब्या आणि अमन पुजारी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीला वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा होता. मात्र, तिला सलग आठव्यांदा मुली झाल्या. यामुळे पती तिचा सतत अतोनात छळ करत होता. पतीच्या सततच्या छळाला संबंधित महिला वैतागली होती. अखेर तिने नवऱ्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने प्रयत्न देखील केले. मात्र, तिचे सर्व प्रयत्न फसले. यादरम्यान, पतीने पुर्नविवाह करण्याचा निर्णय घेतला. पतीच्या या कृत्यामुळे पत्नी संतप्त झाली. रागाच्या भरात तिने पतीवर विष प्रयोग केला. मात्र, तो प्रयत्न देखील फसला. कोणत्याच प्रयत्नांना यश येत नसल्याने तिने अखेर शेजारी राहणारा सराईत गुन्हेगार अमन पुजारी याला पतीला मारण्याची दोन लाखांची सुपारी दिली.
दरम्यान, आरोपी महिलेच्या पतीला मारण्यासाठी गुंड पुजारी याने मित्र शिवम दुबे याला सोबत घेतले. सुपारीसाठी मिळालेल्या पैशातून तलवारी खरेदी केल्या. ७ डिसेंबरच्या रात्री पती दारू पिऊन झोपल्याची टीप पत्नीने हल्लेखोरांना दिली. त्यानुसार संपूर्ण खबरदारी घेत आरोपींनी घरात घुसून पतीवर तलावरीने सपासप वार केले. पती मेल्याचे समजून हल्लेखोरांनी पळ काढला. मात्र, या अपघातातून देखील पती बचावला आणि डाव आरोपी महिलेवर उलटला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली असता, आरोपी अमन पुजारी गुन्ह्याच्या ठिकाणी जाताना निदर्शनास आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने साथीदारासह जखमी पतीच्या पत्नीनेच आम्हाला सुपारी दिल्याचे सांगितले. पत्नीला ताब्यात घेतले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.