यवत : राज्यात कलाकारांच्या अनेक समस्या आहेत. या संदर्भात कराड येथील एका महिलेने फोन केला असता काहीतरी प्रयत्न करावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी कलाकारांच्या अनुदान संदर्भात स्थानिक कमिटीच बसली नाही तर मानधन येणार कसं ? असा प्रश्नच उपस्थित झाला. महाराष्ट्रात अनेक योजना असून, त्या गरिबांपर्यंत पोहोचत नाही, अशी खंत प्रसिद्ध लोककलावंत व समाजसेविका सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली.
त्रिदल महिला शक्ती आघाडी, माहिती सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य, जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका व परिवर्तन ग्रामसंघ यवत यांच्यावतीने यवत येथे श्री गणेश मंगल कार्यालय येथे भव्य महिला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लोक कलावंत व समाजसेविका सुरेखा पुणेकर या होत्या. त्रिदल सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या अध्यक्षा भारती लगड यांनी सामाजिक सेवाभावी कार्याची माहिती देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शितल दोरगे, पोपट लकडे, ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते रमेश लडकत, झोपडपट्टी सुरक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर, अरविंद दोरगे यांसह महिलांनीही आपल्या भाषणातून महिलांच्या अनेक प्रश्नबाबत विचार व्यक्त केले.
यावेळी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या आनंदी जीवन फाउंडेशन (मदत हॉस्पिटल) व निसर्गाच्या सेवेसाठी कायम तत्पर असलेल्या हरितवारी फाउंडेशन यांचा विशेष गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा व पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजवत असलेल्या पत्रकारांना कर्तव्यदक्ष पत्रकार पुरस्कार लोककलावंत सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माणुसकी बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर या बरोबरच यवत पंचक्रोशीतील सर्वसामान्य महिला व नागरिकांच्या विविध रखडलेल्या दौंड पुरवठा विभागातील शिधापत्रिका संदर्भात कागदपत्राची पूर्तता करून सोडवण्याचा संकल्प करण्यात आला.
त्रिदल महिला शक्ती आघाडी महामेळाव्याच्या निमित्ताने अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, मी तेलंगणा राज्यात गेले असता शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधताना तेलंगणा सरकार हे निराधार महिलांना २ हजार रुपये अनुदान देते. परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात २० लाख रुपये अनुदान जमा करते. गरोदर मातांसाठी १ लाख १६ हजार रुपये तर बाळंतपण झाल्यानंतर १६ हजार रुपये व १६ पौष्टिक वस्तू दिल्या जातात. मुलीच्या लग्नासाठी पत्रिका दाखवताच १ लाख १६ हजार रुपये दिले जातात.
आपल्या महाराष्ट्रात भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टीधारकांसाठी आवास योजनेमध्ये २५० स्केअरफुटचे घर दिले जाते. मात्र, तेलंगाना सरकार १००० स्केअर फुटाचे घर देत आहे. मागासवर्गीय नागरिकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपये अनुदान दिले जाते. तेलंगणा राज्यातील गोरगरीब नागरिकांना विज बिल येत नाही, वीज मोफत आहे. तेलंगणा राज्य चांगलं आणि महाराष्ट्र राज्य वाईट असे नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जाऊ शकतात.
तसेच आपल्या राज्यात कलाकारांच्या अनेक समस्या आहेत. या संदर्भात कराड येथील एका महिलेने फोन केला असता काहीतरी प्रयत्न करावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी कलाकारांच्या अनुदान संदर्भात स्थानिक कमिटीच बसली नाही तर मानधन येणार कसं ? असा प्रश्नच उपस्थित झाला. महाराष्ट्रात अनेक योजना असून, त्या गरिबांपर्यंत पोहोचत नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली. याशिवाय, तालुक्यात कोठेही महिलांसाठी कार्यक्रम असल्यास मला कधीही बोलवा मी कायमच आपल्याबरोबर आहे, असे आश्वासन दिले.
यावेळी दौंड तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग अधिकारी प्रकाश भोंडवे, भाऊसाहेब, धांडोरे यांसह राजाभाऊ कदम, डाळिंबचे सरपंच बजरंग म्हस्के, यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सदानंद दोरगे, वि. का. सोचे अध्यक्ष चेअरमन दशरथ दोरगे , सामाजिक कार्यकर्ते मोहसिन तांबोळी, मंगेश रायकर, उमेश म्हेत्रे, विठ्ठल दोरगे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता कुदळे, निवृत्त शिक्षिका संध्या दोरगे, कुमुदिनी अवचट, मिराताई कांबळे, सुनिता सोनवणे, अर्चना बडेकर, दौंड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह माजी सैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन त्रिदल सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, त्रिदल महिला शक्ती आघाडी संस्थापक अध्यक्षा भारती लगड, जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका अध्यक्षा सारिका भुजबळ, परिवर्तन ग्रामसंघ यवत अध्यक्षा राजश्री दोरगे, संभाजी ब्रिगेडचे भरत भुजबळ व सर्व पदाधिकारी यांनी केले होते.