हडपसर : हडपसर परिसरातील एका सदनिकेमधून ३ लाख ७१ हजार १४२ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या संशयावरून घरातील कामवालीची चौकशी करण्यात आली. मात्र, अटकेच्या भितीने आपल्यालाच मारहाण केल्याचा आरोप कामवालीने केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी मनोज अमित आर्या (वय ४२, रा. कुमार पॅराडाईज, मगरपट्टा एनक्स, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या चोरीप्रकरणी फिर्यादीने घरात काम करणारी महिला अलका शिवाजी मेकलवाड (वय २२, रा. जाधव वस्ती, हडपसर रेल्वे स्टेशन जवळ, मुंढवा) यांच्यावर संशय व्यक्त केला. तपासासाठी संबंधित महिलेला ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नोटीस देऊन मगरपट्टा पोलीस चौकी याठिकाणी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्याप्रमाणे महिला पोलिसांच्या समक्ष चौकशीसाठी हजर झाली. त्यानंतर अधिक तपासासाठी त्यांना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा हजर राहण्याची समज देऊन त्यांच्या नातेवाईंकाच्या ताब्यात देऊन सोडले होते.
दरम्यान, या गुन्ह्यामध्ये आपल्याला अटक होऊ शकते या भितीमुळे संबंधित महिलेने तिच्या नातेवाईकांसह मगरपट्टा पोलीस चौकी येथे येऊन, तिला मारहाण झाल्याचे आरोप केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे तक्रारीच्या अनुषंगाने हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राख अधिक चौकशी करीत असून, चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.