लोणी काळभोर, ता. 24: रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात तस्कराने शेतकऱ्याच्या शेतातील चंदनाची झाडे तोडून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील विलु पुनावाला ग्रीनफिल्ड फार्म कंपनीच्या समोर घडली असून मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी संतोष चव्हाण (वय-40 , रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तस्काराच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हे शेतकरी असून ते नायगाव येथे कुटुंबासोबत राहतात. थेऊर (ता. हवेली) येथे गट क्र. 587 व 630 मध्ये चव्हाण यांची शेती आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्याने चव्हाण यांच्या शेतातील 45 हजार रुपये किंमतीची 3 झाडे चोरून नेली आहेत. सदर प्रकार हा 13 मार्च ते 18 मार्च यादरम्यान घडला आहे.
दरम्यान, फिर्यादी चव्हाण यांच्या शेतातील कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडी व आर्थिक फायद्याच्या इराद्याने चोरी करुन नेली आहेत. अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात तस्काराच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश करे करीत आहेत.