लोणी काळभोर : गेल्या महिन्यात थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जमीन विक्री प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, आता या प्रस्तावाला शेतकरी सभासद कृती समिती सदस्यांनी विरोध दर्शवत ‘यशवंत’च्या जमीन विक्रीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी. तसेच संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी साखर आयुक्ताकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन केली आहे. हे निवेदन विकास लवांडे, अलंकार कांचन, लोकेश कानकाटे, राजेंद्र चौधरी यांनी सदस्यांच्या वतीने दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, यशवंत कारखान्यावर गेल्या काही महिन्यांपासून संचालक मंडळ कार्यरत आहे. सदर कारखाना गैरव्यवहार, गैरकारभारामुळे आलेल्या कर्जबाजारीपणामुळे मागील १४ वर्षापासून बंद अवस्थेत आहे. कारखान्याच्या मालकीची थेऊर येथील ९९. २७ एकर जमीन पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याच्या मनमानी निर्णयाला आमचा विरोध असून त्या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी. कारखान्याच्या रयत सर्व सेवा संस्थेकडून कारखान्याला जवळ पास १३-१४ कोटी रुपये येणे आहे. हे अनेक लेखा परीक्षण अहवालात व कलम ८३ कलमच्या चौकशी अहवालात स्पष्ट झालेले आहे.
त्याशिवाय १० डिसेंबर २०१४ रोजी प्राधिकृत अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अंतर्गत दाखल केलेल्या अहवालानुसार तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळावर जबाबदारी निश्चिती केलेली आहे. त्यानुसार दिनांक ०६/०२/२०१५ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९८ अन्वये वसूली प्रमाणपूर् नोटिस संबंधितांना प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग यांनी बजावली होती. सदर रक्कम जवळपास १४ कोटी रुपये वसुलीसाठी आपल्या कार्यालयाकडून अथवा विद्यमान अध्यक्ष संचालक मंडळाने कणतीही कार्यवाही केलेली नाही. विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने सभासदांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालविला असून सहकारी कायदे, नियम पायदळी तुडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

यशवंत कारखान्याच्या मालकीची जमीन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. त्यांच्या संमती शिवाय कारखान्याची जमीन विक्रीस काढली आहे. कारखान्याला एकूण देणी किती आहेत? यांचा कोणताही ताळेबंद हिशोब सभासदांना अद्यापपर्यंत दिलेला नाही. तसेच जाहीर लिलाव पद्धत वापरली नाही. सभेपूर्वी नियमानुसार कारखान्याच्या सभासदांना अंदाजपत्रक, ताळेबंद, सभेची नोटीस दिलेले नाही. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गटवार सध्या किती ऊस क्षेत्र आहे यांची अधिकृत कोणतीही माहिती संचालक मंडळांनी जाहीर केलेली नाही.

कारखान्याला विविध प्रकारची २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त येणी आहेत. त्याबाबत काहीच कार्यवाही न करता केवळ कारखान्याची मालकीची राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेली जमीन मनमानी पद्धतीने विक्रीस काढली आहे. दोन दिवसांत या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आलेली आहे.







