भिगवण (प्रतिनिधी) : भिगवण–राशीन मार्गावर डिकसळ गावच्या हद्दीत ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ज्योतीराम सोमनाथ मुके (वय २०, रा. सीरसाव, ता. परांडा, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावर न थांबता वाहनासह पसार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीराम मुके हा लोणी काळभोर येथून आपल्या गावी सीरसाव येथे हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. MH 25 BH 2824) जात होता. रविवार (दि. १५ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी डिकसळ गावच्या हद्दीत भिगवण पोलीस चौकीच्या भिगवण बाजूकडील भिगवण–राशीन मार्गावर हा अपघात घडला.
यावेळी ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा मोकळा ट्रॅक्टर व ट्रेलर घेऊन जाणाऱ्या अज्ञात चालकाने वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालविल्याने ज्योतीरामच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संबंधित चालकाने जखमी तरुणाला मदत करण्याऐवजी अपघाताची खबर न देता ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मृत तरुणाचा नातेवाईक भगवान गोपाळ रगडे (वय ३१, रा. वाकडी, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार कर्चे यांनी काम पाहिले असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, संबंधित वाहनाचा शोध घेऊन चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






