दौंड (पुणे) : घराशेजारी लावलेल्या कबुतरांच्या पिंजऱ्यातून १५० रेसर कबुतरे आणि एक बिटल जातीची शेळी चोरी करणाऱ्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींनाही दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे. यापूर्वी पोलिसांनी चार आरोपींना दोन महिन्यांपूर्वीच अटक केली होती.
गौरव रोहिदास माकर (वय २५, रा. साळोबा वस्ती) व गोरख मच्छिंद्र जाधव (वय ३५, रा. दोघेही खुटबाव, ता. दौड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी सुजित ज्ञानदेव शिंदे (रा. चोरमलेवस्ती, ता. दौंड) हे घरात झोपले असताना त्यांच्या राहत्या घराशेजारच्या कबुतराच्या पिंजऱ्यातून सुमारे १५० रेसर कबुतरे कुणीतरी अज्ञात चोरून नेत असल्याची माहिती एका शेजाऱ्याने फोन करून फिर्यादीला दिली. त्यावेळी बाहेर येऊन पाहिले असता फिर्यादीला पाहून दोघे अज्ञात चोरटे पळून गेले.
जवळ जाऊन पाहिले असता कबुतराची जाळी तोडून त्यातील कबुतरे चोरून नेल्याचे लक्षआत आले. तसेच शेजारी बांधलेली शेळीही गायब असल्याने लक्षात आल्यावर अज्ञातांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील चार आरोपींना २५ जानेवारी रोजीच अटक केली होती. दौंड पोलिसांनी उर्वरित दोन आरोपी गौरव माकर व गोरख जाधव यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील चोरी गेलेल्या कबुतरांपैकी ४२ कबुतर जप्त करून ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड हा गौरव माकर (रा. साळोबावस्ती) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हवालदार महेश भोसले, सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक आदेश राऊत, रवी काळे आदींनी केली आहे.