उरुळी कांचन, (पुणे) : तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गणपती मंदिरातील दानपेटीसह तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रकमेसह मेडिकलमधील वस्तू लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. ०७) मध्यरात्री ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरडे ग्रामपंचायत हद्दीत गणपती मंदिर आहे. गुरुवारी (ता. ०८) पहाटे पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. यावेळी मंदिराला असलेले कुलूप तोडून मंदिरात असलेली दान पेटी या दोन अज्ञात चोरट्यांनी लांबल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. याच परिसरात रवींद्र विचारे यांचे मेडिकल आहे. या मेडिकलमधून चोरट्यांनी रोख रक्कम व काही वस्तू लांबवले. त्याच ठिकाणी एक दुध डेअरी व हॉटेल असून, या हॉटेलमधून दुधाचे आलेले ७० ते ८० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवून नेहली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या ठिकाणी लोणी काळभोर पोलिसांनी भेट दिली आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंचा पोलिसांनी पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
उरुळी कांचन येथे किराणा दुकानात चोरी
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गडकरी वस्ती परिसरात असलेल्या किराणा दुकानातून रोख रक्कम व काही साहित्य भुरट्या चोरट्यांनी चोरून नेले आहे. यामध्ये चोरट्यांनी तेलाच्या बाटल्या, किराणा साहित्य, चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.