लोणी काळभोर, (पुणे) : लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलेल्या परराज्यातील एका महिलेची पणदरे (ता. बारामती) येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून सुटका केली आहे. याप्रकरणी खामगळवाडी येथील आरोपीवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट धनसिंग खामगळ (वय 25, रा. खामगळवाडी, ता. बारामती), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पोपट खामगळ याच्यावर यापूर्वी बारामती शहर पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग तर, माळेगाव पोलीस ठाण्यात महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे गावात एका परराज्यातील महिलेस डांबून ठेवण्यात आलेले असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या होत्या.
सदर माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला पत्र्याच्या शेडमध्ये आढळून आली. तिच्याकडे चौकशी केली असता कंपनीत काम करणारे मैत्रीणीकडून पोपट खामगळ याचे सोबत ओळख झाल्याचे सांगितले. तसेच खामगळ याचा पणदरे येथे हॉटेल व्यवसाय असून तेथे काम देतो असे सांगून तो घेऊन आला होता. शुक्रवारी (ता. 03) पिडीत महिला ही पत्र्याच्या खोलीत झोपलेली असताना आरोपी पोपट खामगळ याने पिडीतेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही तर कोणास काही एक सांगितले, तर खून करील अशी धमकी दिली. तुझ्यावर वॉचर नेमलेले आहेत, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खून करील, अशी धमकी आरोपीने दिली होती.
दरम्यान, शुक्रवारी (ता. 11) खून करण्याची धमकी देऊन मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेस आरोपीसोबत शारीरीक संबंध ठेवण्यासाठी तयार कर, असे पिडीत महिलेस सांगितले होते. पिडीत महिलेने त्याची मागणी पुर्ण न केल्याने तिला पुन्हा मारहाण करून पत्र्याच्या खोलीत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून पिडीतेला डांबून ठेवले.
पिडीत महिलेने जोडप्यातील महिलेच्या फोन वरून तिचे नातेवाईकास फोन करून सर्व झालेला प्रकार सांगितला. सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या व माळेगाव पोलिसांनी स्टाफच्या मदतीने पिडीतेची सुटका केली. पिडीत महिलेने आरोपी पोपट खामगळ याचेविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेवून पुढील तपास माळेगावचे पोलीस उपनिरीक्षक खटावकर हे करत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, माळेगावच्या पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, देवा साळवे, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, माळेगावचे अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे, गोदावरी केंद्रे यांनी केली आहे.