लोणी काळभोर,(पुणे) : पुण्यावरून दौंडच्या दिशेने धावणाऱ्या पुणे-दौंड लोकलच्या इंजिनच्या पुढील दोन चाकांना चिरा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना लोणी (ता. हवेली) रेल्वे स्थानकात बुधवारी (ता.२८) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लोकल चालकाच्या सर्तकतेमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. मात्र, लोकलमध्ये बिघाड झाल्याने पुणे-दौंड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे-दौंड पॅसेंजर दैनंदिन प्रवासी वाहतूक करते. नेहमीप्रमाणे पॅसेंजर पुण्यातून वेळेवर दौंडच्या दिशेने मार्गस्थ झाली. बुधवारी (ता.२८) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणी रेल्वे स्थानकात पोचली. तेथून काही मिनिटांत निघताना चाकांचा आवाज आल्याने काहीतरी बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने तातडीने ही बाब रेल्वे प्रशासनाला कळवली. त्यानंतर रेल्वे नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी इंजिन तज्ज्ञांशी संपर्क केला. तज्ज्ञांनी लोकल चालकाला ऑनलाईन मार्गदर्शन केले.
लोणी रेल्वे स्थानकात पुणे-दौंड लोकलच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने याचा फटका प्रवाशांना बसला. दोन तास झाला तरी लोकल लोणी स्थानकात जागेवरच उभी ठेवावी लागली. त्यामुळे काही प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करून घरी जाण्याच्या प्रयत्न केला.
दरम्यान, लोणी स्टेशन प्रबंधक एस. पी. जायसवाल यांनी या घटनेची माहिती तत्काळ रेल्वे प्रशासनाला दिली. सदर परिस्थिती हाताळून प्रवाशांच्या सेवेसाठी लोणी स्थानकात एखादी गाडी थांबविण्याची अधिकाऱ्यांना परवानगी मागितली. त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्याकडून दौंडच्या दिशेकडे जाणाऱ्या दरभंगा एक्सप्रेसला लोणी स्थानकात थांबा दिला. त्यानंतर स्टेशन प्रबंधक प्रबंधक एस. पी. जायसवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थिती हाताळून प्रवाशांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रवासी या गाडीत बसले व ही गाडी दौंडपर्यंत सर्व स्थानकांवर थांबली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
गाडी रेल्वे स्थानकात सुटण्याच्या अगोदर ती सुस्थितीत आहे का? ते पाहणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, पुण्यातून डेमो दौंडच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर अवघे दोन स्थानके पुढे गेल्यानंतर इंजिन चाकामध्ये चिरा पडल्याने लोकल बंद पडली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, दुर्घटना असती तर याला जबाबदार कोण? तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई काय होणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी
लोणी काळभोर येथील एका कंपनीत मागील ५ वर्षांपासून काम करत आहे. माझी सकाळची शिफ्ट असल्याने दररोज दुपारच्या गाडीने माघारी घरी जातो. प्रवासासाठी सुखकर असल्याने दररोज या लोकलनेच प्रवास करतो. लोकल कधी उशिरा तर कधी लोकलमध्ये बिगाड होतच असतो. त्यामुळे वेळ खूप वाया जातो. रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि या मार्गावर चांगल्या स्थितीतील लोकल पाठवाव्यात.
– तेजस गवळी, केडगाव, ता. दौंड.