उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रिक्षातून तयार दारु घेऊन विक्रीसाठी निघालेल्या दोघांना उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टीची तयार दारु व रिक्षा असा 3 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गोल्डन लॉज समोर बुधवारी (ता. 29) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
मिथुन बाबु राठोड, (वय 40, रा. सर्वे नं 14, नाईकनगर गणेष वखार शेजारी येरवडा पुणे शहर), व रोहित राजु कापसे (वय 25, रा. सर्वे नं 08, यशवंतनगर, हनुमान मंदिरजवळ, येरवडा, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल संजय खांडेकर, (वय 29) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गोल्डन लॉज समोर बुधवारी (ता. 29) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल खांडेकर व त्यांचे पथक गस्त घालीत होते. यावेळी लॉजच्या समोर एक संशयित रिक्षा दिसून आली. यावेळी रिक्षात दोघेजण दिसून आले.
याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. रिक्षाची पाहणी केली असता रिक्षात बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टीची 28 हजार रुपये किमतीची 35 लिटर मापाचे 8 प्लॅस्टिकची कॅन्ड व त्यामध्ये 280 लिटर तयार दारू आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी तयार दारू व 3 लाख रुपयांची रिक्षा असा एकूण 3 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, पोलीस हवालदार अमोल खांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार होळकर करीत आहेत.