उरुळी कांचन, ता.१० : श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य बैलगाडा शर्यतींचे (ओपन मैदान) ‘आमदार हिंदकेसरी २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. 12) सकाळी ९ वाजल्यापासून या बैलगाडा शर्यतीचे आयोजन सचिन मचाले व रायबान ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष सहकार्य डाळिंब (ता. दौंड) ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागर म्हस्के यांचे असल्याची माहिती आयोजक सचिन मचाले यांनी दिली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ते सात क्रमांकापर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला बुलेट, द्वितीय विजेत्याला युनिकॉर्न, तृतीय, चतुर्थ विजेत्यांना आकर्षक दुचाकी, तसेच पाच, सहा व सात नंबरच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी घाटाची दुरुस्ती करण्यात आली असून, सर्व जय्यत तयारी केली आहे. रविवारी सकाळी साडे आठ वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत घाटाची पूजा करून या बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7350027238, 9850859851, 8767465769 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेचे मुख्य संयोजक सचिन मचाले यांच्याकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करत या शर्यती पार पाडल्या जात आहेत. शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे. तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खिलार बैलजोडीच्या किमती या लाखोंच्या घरात गेल्या आहेत.