भोर / जीवन सोनवणे : राजगड पोलीस स्टेशन हद्दीत 70 हजार रुपये किमतीची इंटरनेट केबल चोरी करणारे जेरबंद केले असून, वैभव वाडकर (रा.वारवडी) व सुमित जगदाळे (रा.गराडे) या दोघांना अटक केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस स्टेशनमध्ये 70 हजार रुपये किमतीची इंटरनेट केबल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. आरोपींनी एका हॉटेलमधून पाण्याची बाटली घेतली व त्याचे पेमेंट पेटीएमने केले होते. त्यावरून संशयित आरोपींचा तपास मिळाला. राजगड पोलिसांनी गुन्हा उघड केला.
यामध्ये वैभव वाडकर (रा.वारवडी) व सुमित जगदाळे (रा.गराडे) यांना अटक केली असून, गुन्ह्यातील चोरी गेलेली केबल जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा केबलचे काम करणारे कामगार असून, यातील सुमित जगदाळे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर विभाग) तानाजी बेर्डे, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ, पोलिस हवालदार कोल्हे, खरात, राऊत यांनी केली.