पुणे : पीएमटीमधून प्रवास करणाऱ्या महिला, वृद्धांना हेरून त्यांचे दागिने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपासात आरोपीवर दोन गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हा सराईत गुन्हेगार उत्तर प्रदेशातून पुण्यात येऊन दागिने चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
याबाबत जिजाबाई लक्ष्मण कदम (वय ७२, रा. आंबेगाव खु., जांभुळवाडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चांदबाबू अलीहुसेन शेख (वय-३०, रा. बेचाळीस चौक, कोंढवा खुर्द, मुळ रा. गाव गौरव काला पोस्ट, महमदपूर, ता. कैरनलगड, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सहाच्या सुमारास पद्मावती बस स्टॉप ते बालाजीनगर असा पीएमटी बसमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन आरोपी अहिल्यादेवी चौकात त्यांच्या हातातील दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने तोडून चोरून पळून जात होता. त्यावेळी फिर्यादी व नागरिक तसेच गस्तीवरील पोलीस अंमलदार सुशांत फरांदे व महेश मांडलीक यांनी पाठलाग करुन आरोपीला पकडले होते. पोलिसांनी आरोपीकडून ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी व १०० रुपये किमतीचे कटर जप्त केले.
दरम्यान, आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता, आरोपीने दोन ते अडीच महिन्यांपूर्वी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची २५ हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून सहकारनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, संशयास्पद प्रकार आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक ११२ किंवा महिला हेल्पलाईन नंबर १०९१ यावर तत्काळ मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन सहकारनगर पोलिसांनी महिला व वृद्ध नागरिकांना केले आहे.