हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी मला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी मी तत्पर आहे, असे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन आमदार राहुल कुल, आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या प्रमूख उपस्थितीत झाले. या वेळी कुल बोलत होते.
या वेळी बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद, संचालक प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, नानासाहेब आबनावे, लक्ष्मण केसकर, मिलिंद हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, संतोष कांचन, राहूल शेवाळे, तालुकाध्यक्ष शाम गावडे, पूनम चौधरी, प्रियांका चौधरी, सुहास चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यापुढे बोलताना कुल म्हणाले, “भीमा सहकारी साखर कारखान्याचा २३ वर्षे अध्यक्ष होतो. सहकारी चळवळ वाचली पाहिजे. तुम्ही सर्वांनी ठरविले तर यशवंत सहकारी कारखाना सुरु होईल. हडपसरपासून ते दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीची समस्या टप्प्याटप्प्याने सोडवली जाणार आहे. पूर्व हवेलीतील ही मागणी आहे. ती समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. तसेच मुळशी धरणाचे पाणी दौंड व बारामती या जिरायत भागात पुढील काही दिवसांत फिरवले जाणार आहे. या पाण्यासंदर्भात राजकीय एकमत झाले आहे. पुढच्या काही कालवधीत या भागात पाणी वळविण्यात येणार असून, पुढील १०० वर्षांचे नियोजन करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना माळशिरसचे आमदार राम सातपुते म्हणाले, “सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’ला जो कोणी येतो तो आमदार होतोच. निस्वार्थ स्वभावाने जनतेची सेवा करतात. त्यांना जनता साथ देतेच. सांस्कृतिक तसेच समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम करून सोरतापवाडीसारख्या गावाच्या विकासाचा ध्यास सुदर्शन चौधरी यांनी घेतला आहे. त्यामुळे निश्चितच पुढील काळात राज्यात या गावाचे नाव घेतले जाणार आहे.”
जिल्हा बँकेचे संचालक भाजपचे नेते प्रदीप कंद म्हणाले, “ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करीत असताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न सुदर्शन चौधरी यांनी केला आहे. २१ कोटी रुपयांचा निधी या गावासाठी आणून, गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुदर्शन चौधरी यांनी केले असून, आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. येणाऱ्या काळामध्ये थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी राहुल कुल यांनी लक्ष घालावे. हवेलीचे गतवैभव पुन्हा परत मिळवून देण्यासाठी हवेलीच्या नागरिकांकडून विनंती करतो.
सुदर्शन चौधरी म्हणाले, “परिसरात दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे वाटप केले जाते. ग्रामीण भागात फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांतून समाजप्रबोधन करण्यात सुदर्शन युवा मित्र मंडळ कायम तत्पर आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी केले, तर आभार प्रियांका चौधरी यांनी मानले.