केडगाव : केडगाव परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चौफुला येथून घरी जात असताना रात्रीच्या वेळी मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नितीन गोपालभाई पटेल (वय-३७) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या तरुणाच्या मागे पश्चात आई-वडिल आणि दोन लहान मुले व पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा नागरिकांचे मन हेलावून टाकणारा होता.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरूर- चौफुला या महामार्गाचे काम चालू आहे. चौफुला येथे प्रगती ट्रेडर या नावाने मृत युवकाचा व्यवसाय आहे. शिरूर- चौफुला या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत ऑगस्ट २०२४ अशी आहे. मात्र, अद्याप रस्त्याचे काम आत्तापर्यंत अर्धवटच दिसून येत आहे. या कामांमध्ये ठेकेदारानी वेगवेगळ्या ठिकाणी उकरलेल्या रस्त्याच्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याजवळ योग्य दिशादर्शक, रिफ्लेक्टर आणि फलक बसवलेले नाहीत. त्यामुळे वेळोवेळी अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागास स्थानिकांनी निदर्शनास आणुन दिले आहे.
मात्र, अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारावर कसलीही कारवाई झालेली दिसून येत नाही. या महामार्गावर १० मोठे खाजगी दवाखाने आणि ५ मोठ्या खाजगी शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व रुग्णांची प्रचंड धावपळ होते. म्हणून, ते काम जलद गतीने होणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठिकाणी रस्त्याला विरोध होत असल्याने काम वेळेत पूर्ण करणे शक्य झाले नाही, अशी खंत राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता प्रेरणा कोटकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना खडतर प्रवासाच्या यातना सहन करून या रस्त्यावरून जावे लागत आहे. या महामार्गावर घडलेल्या अपघातामुळे अनेक नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर काल घडलेल्या घटनेमध्ये या युवकाला नाहक जीव गमवावा लागला आहे. या घटनेला राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी सदर कुटुंबातील कर्ता पुरुष मृत पावल्यामुळे कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.