राहुलकुमार अवचट
यवत : पुणे – सोलापूर महामार्गावरील यवत (ता.दौंड) येथील सेवा रस्तावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यवत परिसरात मंगळवारी (ता.६) सायंकाळी दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावरच पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या रस्त्याच्या सुविधांकडे महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यवत येथे पावसाने भुयारी मार्ग ते स्टेशन रोड परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले. सेवामार्गावरील ठिकठिकाणी साचलेले पाणी योग्य पद्धतीने भूमिगत गटांरांमध्ये सोडून देणे अपेक्षित होते. परंतु हे होत नसल्याने स्थानिक नागरिकांना त्या खड्यातील साचलेल्या पाण्यामधून ये-जा करावी लागत आहे.
परिणामी या ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहे. सेवा रस्तावर अनेक खड्डे पडलेले असून, दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्ग व परिसरातील पाणी जाण्यासाठी असलेल्या गटारीची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, टोल कंपनीची एक गाडी देखरेख करण्यासाठी पाटस ते यवत असे सतत लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत असते. त्यांना हे खड्डे दिसत नाही का, याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. या ठिकाणी मोठी अपघाताची घटना घडल्यास किंवा जीवीतहानीची घटना घडल्यास पाटस टोलनाका कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदार धरावे. अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.