लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील बंद असलेला कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाक्यावर लावण्यात आलेला फ्लेक्स महामार्गावर पडल्याने आज बुधवारी (ता. 15) पुण्याकडे जाणारी महामार्गाची एक लेन पूर्णतः बंद झाली आहे. शुक्रवारी (ता. 10) लोणी काळभोर पोलिसांनी याच टोलनाक्यावर पडलेला फ्लेस काढला होता. त्यातच आज आणखी फ्लेक्स पडला आहे. त्यामुळे टोलनाक्यावर लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स बंदची नागरिकांनी मागणी केली आहे.
मागील सहा वर्षांपूर्वी कवडीपाट टोलनाका बंद झालेला असून त्याचा सांगाडा अद्यापही महामार्गावरच आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच बंद पडलेल्या कवडीपाट टोलनाक्याचे करायचे काय? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
टोलनाक्यासह परिसरात रात्रीतून अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली आहे. या टोळ्या जाहिरातदारांकडून पैसे घेऊन रात्रीत शेकडो अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड आणि कोऑक्स रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये लावत आहेत. त्यामुळे या टोळ्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, कवडीपाट टोलनाका बंद झाल्यापासून या ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावण्यात येत असल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. होर्डिंग्जपेक्षा अनधिकृत फ्लेक्सचा अधिक सुळसुळाट झाला आहे. या घटनेत कोणताही अपघात झाला नसला तरी वारंवार होणाऱ्या अशा घटनेकडे संबंधित विभाग टाळाटाळ करीत आहे. हे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कारवाई कधी?
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक अनधिकृत होर्डिंग्ज धोकादायकरीत्या लावलेल्या आहेत. या धोकादायकरीत्या लावलेल्या होर्डिंग्जमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाच्या वतीने कारवाई होणार का ? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.