भोर : वेळू (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक झाली. या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत शाळा परिवर्तन पॅनेलचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. तर शाळा विकास आघाडी पॅनेलचे ४ प्रतिनिधी निवडून आले आहेत. लोकशाही पद्धतीची नितीमुल्ये विद्यार्थ्यांत रुजावित यासाठी शालेय निवडणूक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक मंदा गायकवाड यांनी सांगितले.
शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष निवडणुकांच्या धरतीवर नियोजनबद्ध मतदान प्रक्रिया राबविली. यामध्ये गोपनीय व पारदर्शी पद्धतीने निवडणूक राबवून एक व्यक्ती एक मत देवून विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रीमंडळ निवडले.
या निवडणुकीत १३८ मतदारांपैकी १०८ मतदारांनी मतदानाचा हक्क अतिशय उत्साही पद्धतीने बजावला. त्यापैली एक मतपत्रीकेवरील मतदान बाद झालेले आढळून आले. मतदान प्रक्रिया संपल्यावर मतमोजणी घेण्यात आली. सदर मतमोजणी झाल्यावर निकाल जाहिर करण्यात आला.
पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन तंत्रज्ञानाच्या साह्याने तसेच अभ्यासक्रमाशिवाय प्रत्यक्ष अनुभव देणारा तंत्रज्ञानवाद रुजवण्यासाठी दप्तरमुक्त उपक्रमांतर्गत ईव्हीएम मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल तिखे, माजी अध्यक्ष राहुल पांगारे, पत्रकार दिघे उपस्थित होते.
दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रक जाहीर केले गेले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापिका मंदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या उपक्रमात निवडणूक प्रशिक्षण अधिकारी व या बाबतचे संपूर्ण नियोजन राजेंद्र जाधव सर, सुर्यवंशी मॅडम, घुगरे मॅडम, अनभुले सर यांनी केले होते.
या निकालात शाळा परिवर्तन पॅनेलचे ५ उमेदवार तर शाळा विकास आघाडी पॅनेलचे ४ प्रतिनिधी निवडून आले. विजयी उमेदवारांचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. सदर निवडणूक खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.