केडगाव (पुणे) : दौंड, हवेली तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीचे पात्र आज गुरुवारी दुथडी भरून वाहू लागले आहे. मुळा – मुठा या नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने योगीराज संतराज महाराज तिर्थशेत्र व वाळकी, रांजणगाव, आलेगाव, पिराची वाडी अशा गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या संपर्क तुटला आहे. गुरुवारी (दि.25) रोजी पुलावर पाणी आले. गेल्या दोन दिवसापासून दौंड मावळ, खेड, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्याने मुळा – मुठा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नदीच्या दोन्ही बाजूने शेत जमीन पाण्याखाली गेली आहे.
अनेक नदीकाठच्या गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल वाहतूक विभाग यांच्या वतीने मुळा मुठा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट लावण्यात आले आहे. रस्ता बंद करून वाहतूक देलवडी – राहु तसेच पारगाव या बाजूने फिरवली असल्याची माहिती तलाठी दिपक अजबे व त्याचे सहकरी रत्नाकर गायकवाड यांनी दिली. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुळा – मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरून पाणी गेल्याने बघ्यांची मोठी गर्दी परिसरात झाली होती.
खडकवासला धरणामधून मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घेण्यात यावी.
-अरूण शेलार, तहसीलदारराहु येथील मुळा मुठा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तरी पुर परिस्थितीमध्ये मुळा मुठा तसेच भिमा नदीपात्रामध्ये न जाणे तसेच कोणत्याही प्रकारची वाहतूक पुलावरून करू नये.
– विकास शेलार – संचालक, भिमा पाटससगळीकडे मुसळधार पाऊस सुरु आहे. अशावेळी घाई गडबडीमध्ये कोणीही मोटर काढण्यासाठी नदीला जाऊ नये. पावसाळ्याच्या दिवसात नदीचा संपूर्ण वीजपुरवठा बंद केलेला आहे. काही ठिकाणचे फिडरवर गावांचा वीज पुरवठा असल्यामुळे नदीचा काठ बंद करता आलेला नाही. त्यामुळे कुणीही नदीकाठी मोटर काढण्यासाठी जाऊ नये. त्याचप्रमाणे जोपर्यंत पाऊस सुरु आहे तोपर्यंत आपल्या शेतातील मोटर चालू बंद करताना व्यवस्थित ती खबरदारी घ्यावी.
– पप्पू पिसाळ – शाखा अभियंता, महावितरण -पिंपळगाव