लोणी काळभोर (पुणे) : १ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालके, ६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणारी व शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी (औषध) देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ या ठिकाणी मंगळवारी (ता. १३) आरोग्य विभाग व पंचायत समिती, हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम- २०२४’चे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, लोणी काळभोरचे माजी सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच प्रियांका काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ललिता काळभोर, राजेंद्र काळभोर, संगीता काळभोर, सविता लांडगे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, रुपाली बंगाळे, कनिष्ठ सहायक महेंद्र खेडेकर, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, “१ ते १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. हे आजार उद्भवू नयेत यासाठी जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात. परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालक व मुलांमध्ये जंतांचा प्रादूर्भाव वाढतो. जंतांमुळे अॅनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता, आतड्यास सूज येणे असे परिणाम बालकांवर होतात. हे आजार उद्भवू नयेत यासाठी जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात.
गटविकास अधिकारी भूषण जोशी म्हणाले, “इंग्लिश मिडीयम माध्यमातून ५० व त्यापेक्षा अधिक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत आलेले आहेत. त्यामुळे येथील शिक्षणाचा ओढा निश्चीतच मुलांना व त्यांच्या पालकांना लागला आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. तसेच जंतनाशक गोळीमुळे मुला-मुलींचे आरोग्य चांगले राहते. पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावतो. मुलांनी नेहमी हात स्वच्छ धुवावेत, निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे, व्यवस्थित शिजलेला आहार घ्यावा, निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत, त्यामुळे जंतुसंसर्ग थांबवण्यास मदत होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वीराज काळे याने केले. सूत्रसंचालन रोहिदास मेमाणे, तर आभार सोमनाथ शेंडकर यांनी मानले.