राहुलकुमार अवचट / यवत : यवत गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मातेची शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी पाचव्या माळेला निघणारी भव्य तोरण मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. पाचव्या माळेनिमित्त सायंकाळी पाचच्या सुमारास दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांच्या हस्ते देवीच्या रथाची पूजा करून आई राजा उदो उदो च्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली.
नेत्र दीपक वादन व आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील प्रसिद्ध अशोका बँजो बँडच्या वादनाने यवतकर मंत्रमुग्ध झाले, पारंपारिक पद्धतीने बैलगाडी, घोड्यावर बसलेल्या स्त्रीशक्ती प्रेरक राणी लक्ष्मीबाई, नेत्रदीपक केलेली विद्युत सजावट, पोतराज यांनी केलेले आकर्षक नृत्य, महिलांच्या हातातील बाण व याबरोबरच देवीच्या मुखवट्यास केलेली सजावट, मंदिर परिसरात केलेली रांगोळीचे पायघड्या यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
महालक्ष्मी मंदिरापासून निघालेली मिरवणूक श्री काळभैरवनाथ मंदिर, नूतन चौक, चांदणी चौक, मराठी शाळा, पुणे सोलापूर महामार्गाने पुन्हा मंदिरात आली. यावेळी संपूर्ण मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायगड्या, जागोजागी महिलांनी ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर मंदिरात जवळ आल्यानंतर महाभोंडला व कलश स्पर्धा संपन्न होत देवीची ओटी भरून तोरण अर्पण केल्यानंतर आरती करण्यात आली. श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्यावतीने महाप्रसादाची वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.