– संतोष पवार
पळसदेव ( पुणे) : पावसाची अनियमितता आणि सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा फटका पिकांना बसत असल्याने पालेभाज्यांचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. परिणामी दैनंदिन आहारामध्ये लागणाऱ्या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ग्रामीण भागातील आठवडा बाजारातील भाजीपाला दरात सातत्याने वाढ होत असल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांची व विक्रेत्यांची अवस्था कभी खुशी कभी गम अशी झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडा बाजारात सर्वच प्रकारच्या भाजीपाल्यांचे दर प्रति पावकिलो 30 ते 40 रुपये म्हणजेच प्रतिकिलोसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम नागरिकांना मोजावी लागत आहे. कोबी, फ्लॉवर, गवार, भेंडी, वांगी, कारले, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, मेथी, पालक आदि पालेभाज्यांची बाजारातील आवक कमी झाल्याने त्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते आहे.
सध्या जून महिन्यातील पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला खराब झाला तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने भाजीपाला वाहुन गेला आहे. परिणामी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसातही भाजीपाल्याच्या दरातील झालेली वाढ कायम राहण्याचे संकेत व्यापारी वर्गातून मिळत आहेत.