उरुळी कांचन : आलिशान चारचाकी गाड्या आणि त्याला काळ्या काचा लावून फिरणाऱ्या कार चालकांची मुजोरी पूर्व हवेलीत वाढत चालली आहे. काळ्या काचांच्या वापरावर बंदी असूनही कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात त्यांचा सर्रास वापर केला जात आहे. अनेकदा समाज कंटकांकडून गैरकृत्य, गुन्हे करण्यासाठी काळ्या काचांचा गैरवापर होण्याचा धोका असल्याने त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र, लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलिसांकडून या वाहनचालकांवर कारवाई होण्याऐवजी सूट देण्यात येत आहे. असा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासोबतच वाहनांवर काळ्या काचा लावणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई कधी करणार? याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. नियमांचा भंग करत वाहनांना काळ्या फिल्म्स लावणारे आणि फॅन्सी नंबर प्लेटधारकांची संख्याही मोठी आहे. कारच्या काचांना काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई पोलीस कधी करणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
वाहनांच्या समोरील आणि पाठीमागची काच ही 70 टक्के आणि बाजूच्या काचा किमान 50 टक्के पारदर्शक असाव्यात, असे केंद्रीय मोटर वाहन अधिनियमात नियम 100 नुसार बंधनकारक आहे. काचांवर कोणत्याही प्रकारच्या काळ्या फिल्म्स अथवा इतर पदार्थ लावू नये. लावल्यास पोलिसांनी अथवा संबंधित अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्या काढून टाकाव्यात, असे शासनाचे 20 ऑक्टोबर 2012 रोजीचे आदेश आहेत. परंतु, अत्यंत गडद काळ्या रंगाच्या काचा बसवून किंवा काचांवर फिल्म्स चिकटवून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न वाहनचालकांकडून केला जातो. विशेषतः बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा अशा काळ्या काचा करण्याकडे ओढा असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानंतरही उरुळी कांचन पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.
यांच्यावरही व्हावी कारवाई…
वाहतूक शाखेकडून विना हेल्मेट दुचाकीस्वारांना सातत्याने लक्ष्य केले जाते. त्यामुळे सर्वसामान्य असणाऱ्या दुचाकीस्वारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. परंतु, त्याचवेळी चारचाकी वाहनांच्या काचांना सर्रासपणे काळ्या फिल्म्स लावून त्या पूर्व हवेलीतील रस्त्यांवर बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. त्या वाहनांविरोधात मात्र, दंडात्मक कारवाई होत नाही. हा दुजाभाव का, असा रास्त प्रश्न सजग नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा मुजोर कार चालकांवरही कारवाई व्हावी व अशा कारवाईत सातत्य असावे, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिष्ठितांकडे दुर्लक्ष …
सध्या लोकसभेनंतर विधान सभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. राजकीय नेत्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा सतत शहरात वावरतो आहे. यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना काळ्या फिल्म्स लावण्यात आलेल्या आहेत. या प्रतिष्ठितांच्याही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्याकडे वाहतूक पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कदमवाकवस्ती परिसरात टवाळखोर चालकांचा धुडगूस
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्तीच्या परिसरात ओम शिल्प नावाची एक इमारत आहे. या इमारतीच्या शेजारी एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. मात्र बऱ्याच दिवसापासून या इमारतीचे काम बंद पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक टवाळखोर मुले व मुली या ठिकाणी दररोज मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास येतात. व जोरजोरात हॉर्न व बुलेटमधून फटाक्याचा कर्णकर्कश आवाज काढतात. या ठिकाणी अर्धा तासाहून अधिक वेळ गोंधळ घालतात. त्यामुळे या टवाळ वाहनचालकांचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या टवाळखोर चालकांवरही कारवाई करावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.