पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात पती बाहेरगावी गेलेला असताना त्याच्या पत्नीचा खून करून मृतदेह घरातील पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. हा प्रकार शुक्रवारी (दि. ८) फुरसुंगी येथील हुंडेकर वस्ती येथे उघडकीस आला होता. या खुनाचे रहस्य उलगडण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) असं मृत महिलेचे नाव आहे. स्वप्नाली हिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले असून पवार दाम्पत्याच्या घरी नेहमी येणाऱ्या व्यक्तीने हा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत तिचा पती उमेश पवार (वय-३६, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश पवार हे उबेर टॅक्सीचालक आहेत. त्यांना बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री गाडी घेऊन गेले होते. भाडे सोडून सकाळी ते परत घरी आले असता त्यांना घराला बाहेरून कडी लावलेली आढळून आली. घरात त्यांची पत्नी नव्हती. त्यांनी परिसरात शोध घेतला तरी ती आढळून आली नाही.
तसेच घरातील दागिने, पैसे व तिचा मोबाइलही दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी पलंगाच्या बॉक्समध्ये दागिने व सोने आहेत का? हे पाहण्यासाठी पलंग उघडला, तेव्हा आत स्वप्नालीचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात स्वप्नालीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला होता. त्यांच्याकडे नेहमी येणारा ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे, तो येऊन गेल्याचे निष्पन्न झाले असून पोलिस त्या ‘काका’चा शोध घेत आहेत.