उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायतीच्या निर्माणाधीन इमारतीत आढळलेल्या 54 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटली असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
विनोद महेंद्र ठाकूर (वय -54, रा. रा. गगन आकांक्षा सोसायटी, प्रयागधाम हॉस्पिटल शेजारी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा मनीष विनोद ठाकूर (वय -21) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 194 नुसार नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामस्थळी एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी (ता. 01) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानुसार त्या परिसरात असलेले अभिषेक नारीया यांनी त्यांचा मुलगा मनीषला फोन करून माहिती दिली की “तुमचे वडील ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीच्या ठिकाणी मृत अवस्थेत पडले आहेत”
या घटनेची माहिती मिळताच, मनीष ठाकूर व त्यांचे मित्र ऋषिकेश गायकवाड हे मोटार सायकलवरून घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले असता, वडील बांधकामस्थळी मृत अवस्थेत पडले होते. त्यांच्या कपड्यांवर पाणी सांडल्यामुळे ते ओलसर झाले होते तसेच नाक व तोंडाजवळून रक्त येत असल्याचेही दिसून आले.
मृत विनोद ठाकूर हे दारूच्या नशेत अनेकदा फिरत असत. त्यामुळे त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत निश्चित माहिती नाही. मरणाबाबत काही एक तक्रार नसल्याचे मुलगा मनीष ठाकूर यांचा जबाब उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोमणे करीत आहेत.