पुणे : पुण्यातील भूमकर ब्रीज-नऱ्हे भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी खासगी बसची वाट पाहणाऱ्या आजी आणि नातीला आयशर ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दोघींचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
शीतल सिद्धराम पाटील (वय-४२) आणि अबोली सूरज शेटके (वय-६) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आजी आणि नातीचे नाव आहे. याबाबत रोहन पाटील (१९, रा. नऱ्हे) याने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग सुनील पिनाटे (वय-२८, रा. तुगाव, ता. भालकी, जि. बेळगाव, कर्नाटक) या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील कुटुंबीय शनिवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरला निघाले होते. त्यावेळी बाह्यवळण मार्गावर पाटील कुटुंबीय खासगी प्रवासी बसची वाट पाहत थांबले होते. शीतल पाटील यांनी नात अबोलीला कडेवर घेतले होते. त्यावेळी भरधाव ट्रकचालकाने शीतल आणि अबोलीला धडक दिली. या अपघातात दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड करत आहेत.