लोणी काळभोर (पुणे) : लोकसभा आचारसंहिता संपताच थेऊर (ता, हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांना दिले.
‘यशवंत’चे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष जगताप व उपाध्यक्ष मोरेश्वर काळे यांनी दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप दादा कंद यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या वेळी वरील आश्वासन फडणवीस यांनी दिले.
या वेळी सुभाष जगताप यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, संचालक प्रशांत काळभोर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमदार राहुल कुल व प्रदीप दादा कंद यांनी यशवंतच्या अडचणींबाबत पूर्ण माहिती दिली आहे. यशवंतच्या २१ हजार सभासदांचा विचार करून कारखाना लवकरात लवकर चालू करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यास राज्य सरकार तयार आहे. राज्य शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच कारखान्यावर असलेल्या विविध वित्तीय संस्थांचा बोजा कमी करण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळांना राज्य सरकार मदत करणार आहे.