लोणी काळभोर : विद्यार्थ्यांची भक्कम पुर्व तयारी करण्यावर भर देण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे शाळा पूर्वतयारी मेळावा होय, असे प्रतिपादन लोणी काळभोर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांनी केले आहे.
कदमवस्ती (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवारी (ता.१३) करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन राजेंद्र जगताप यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका सविता कळमकर, उपशिक्षिका नजमा तांबोळी, कामिनी जगधने, सोनाली खंडाळे, सीमा साबळे, नवनाथ पानमंद, सचिन कराड, महेश पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पुढे बोलताना राजेंद्र जगताप म्हणाले की, इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करणे व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या वर्गात बालकांचे सहज संक्रमण घडून आणणे. हा या उपक्रमामागचा शासनाचा उद्देश आहे.
दरम्यान, या अभियानातून पालक आपल्या मुलांची तयारी दिलेल्या पुस्तिकेतून कशाप्रकारे घेतील याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालकांच्या पायाभूत क्षमता विकसनासाठी उपयुक्त असे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले.