पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याच्या रागातून पहिल्या पतीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ०6) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कसबा पेठ परिसरात घडली आहे.
सोनल उर्फ सुमित पाटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सनी राजेंद्र मारटकर (रा. गवळी आळी, पुणे) आणि एका अनोळखी व्यक्ती असे खून करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पत्नी प्राजक्ता सोनल उर्फ सुमित पाटेकर (वय-34 रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या हल्ल्यात प्राजक्ता यांनाहि गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी मारटकर हा प्राजक्ता यांचा पहिला पती आहे. दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे घटस्फोटानंतर प्राजक्ता यांनी सुमित याच्यासोबत दुसरे लग्न केले होते. या गोष्टीचा राग आरोपी सनी याच्या डोक्यात होता. यातूनच सनी याने आपल्या एका साथीदाराला सोबत घेऊन गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता यांच्या कसबा पेठेतील घरी आला होता.
यावेळी प्रजक्ता, त्यांची सासू आणि पती गप्पा मारत बसले होते. काही समजण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने समीत याच्यावर खुनी हल्ला केला. त्याच्या डोक्यात, तोंडावर आणि हातावर सपासप वार केले. हा प्रकार पाहून प्राजक्ता चा पती सुमीत याला वाचवण्यासाठी मध्ये आले. आरोपींनी त्यांच्या डोक्यात व हातावर धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या सुमीत याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव करीत आहेत.