लोणी काळभोर : महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्यावतीने 22 जून 2024 ते 28 जून 2024 या कालावधीत राज्यात “शिक्षण सप्ताह” आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा, सांस्कृतिक, कौशल्य डिजिटल दिवस, इको क्लब उपक्रमाचा समावेश आहे. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गती देईल. व याचा भविष्यात विद्यार्थ्यांना जीवन जगताना नवीन दिशा देईल, असे प्रतिपादन प्राचार्य पौर्णिमा शेवाळे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचे अंतरंग आणि बाह्यअंग विकसित करून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मिडीयम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्थेने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन पौर्णिमा शेवाळे यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शेवाळे म्हणाले की, विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य, भिंती पत्रके, चित्रे, भावल्या, मातीकाम, गणिती परिपाठ, कोडी, संख्याज्ञान, प्रदूषण संवर्धन, वृक्षारोपण संवर्धन व त्याचे महत्त्व, घोषवाक्य, विविध देशी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षक विद्यार्थी कथाकथन, वाचन, प्रभात फेरी, सामुदायिक सहभाग इत्यादी आनंददायी उपक्रम शिक्षण महोत्सव सप्ताहात राबवण्यात आले आहेत. या शिक्षण सप्ताहामुळे विद्यालयातील शैक्षणिक वातावरण आनंददायी बनले आहे.