बारामती, (पुणे) : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे शेतामध्ये पडलेल्या अवस्थेत ड्रोन एका शेतकऱ्याला दिसून आला आहे. या घटनेबद्दल शेतकऱ्याने तातडीने माळेगाव पोलिसांना संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांनी या ठिकाणी येऊन या ड्रोनची पाहणी केली व हे ड्रोन ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत तावरे यांची माळेगाव बुद्रुक येथे शेती आहे. दोन-तीन चांगले पाऊस झाल्यामुळे आता शेतीला वाफसा आला की नाही हे पाहण्यासाठी तावरे हे सकाळच्या वेळी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना आपल्या शेतात हे ड्रोन पडलेले दिसून आले. त्यांनी तातडीने माळेगाव पोलिसांना संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांनी या ठिकाणी येऊन या ड्रोनची पाहणी केली व हे ड्रोन ताब्यात घेतले आहे.
बारामतीसह आजुबाजूच्या इंदापूर, दौंड, पुरंदर, माळशिरस, फलटण, करमाळा, शिरूर अशा अनेक तालुक्यांमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून ड्रोन च्या माध्यमातून आपल्या भागाची हेरगिरी होत असल्याचा संशय आहे. काही ठिकाणी नागरिक रात्र रात्र जागून काढत आहेत. महिला व मुलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे, मात्र तरी देखील हे ड्रोन नेमके कोण उडवतात? कशासाठी उडवतात? त्याच्या मागचा त्यांचा हेतू काय? हे मात्र उघड करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
दरम्यान, हे ड्रोन उडवून आपल्या घराची वाड्यावस्त्यांची किंवा दुकानांची हेरगिरी होत असल्याचा नागरिकांना संशय आहे. दुसरीकडे ड्रोनद्वारे टेहळणी करून नंतर चोऱ्या होत असल्याचाही नागरिकांचा संशय आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये व निमशहरी भागांमध्ये ड्रोन हा काळजीचा विषय झाला आहे. पोलिसांनी अनेकदा ही लहान आकाराची विमाने रात्रीच्या वेळी उड्डाण करतात असे सांगून वेळ मारून नेली, मात्र आता प्रत्यक्षात शेतामध्ये देखील ड्रोन दिसू लागल्याने पोलिसांनी यावर सतर्कतेने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.