पुणे : पुण्यातील लोहगाव येथील गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र पोलिस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा (एमपीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या पाठपुराव्यामुळे नेदरलँडमधील एका निमशासकीय संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या संस्थेच्या माध्यमातून पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने लोहगाव येथे पोलिसांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.
सामंजस्य कराराची कागदपत्रे एमपीएमसीकडे नुकतीच हस्तांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख तसेच परदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली. शनिवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात याबाबतची कागदपत्रे अटल कन्सल्टिंगचे प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुमार कुप्पा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. या वेळी अटल कन्सल्टिंग नेदरलँडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीहान वाटले व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते. एमपीएमसीचे अध्यक्ष भरतकुमार राणे उपस्थित होते.
राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या ५२४८ घरांचा तसेच १६० दुकानांचा प्रकल्प लोहगावमधील ११७ एकरांवर साकारण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्प २०१२ पासून रखडला होता. पोलिसांच्या घरांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख आणि सहसचिव कौस्तुभ धावसे यांनी या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरा वरील वित्तीयपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून गुंतवणूक आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.
त्याअनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी मुंबईत नेदरलँडस्थित संस्था आणि उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर गुंतवणूक करण्याचे निश्चित झाले. त्यानिमित्ताने एक छोटेखानी सोहळा मुंबईत पार पडला, असं अंबर आयदे यांनी यावेळी सांगितले.