पुणे, ता. १ : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हरवलेला मोबाईल अवघ्या ३० मिनिटांत शोधून परत देत चंदननगर पोलिसांनी तत्परतेचे दर्शन घडविले. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे विद्यार्थ्याला मोठा दिलासा मिळाला असून, त्याने पोलिसांचे मनापासून आभार मानले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश प्रमोद सरवदे हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असून, मंगळवारी (दि. १) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मोबाईल हरवला होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण घुटे आणि सुशील बेंद्रे यांनी तात्काळ मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले.

त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन त्यांनी अत्यंत शिताफीने शोधमोहीम राबवत अवघ्या अर्ध्या तासात मोबाईल शोधून विद्यार्थ्याच्या ताब्यात दिला. महत्त्वाच्या शैक्षणिक माहिती, अभ्यासाचे साहित्य आणि वैयक्तिक कागदपत्रे मोबाईलमध्ये असल्याने मोबाईल परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करत विद्यार्थी यश सरवदे यांनी चंदननगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या घटनेमुळे चंदननगर पोलिसांच्या तत्पर व नागरिकाभिमुख कामगिरीचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.







