पुणे : पुणे- नाशिक महामार्गावर एक विचित्र अपघात आहे. रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन अपघात झाल्याची धक्कादायक घटना डोळासणे येथे घडली आहे.
या अपघातात १ ठार तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
विजय शंकर डेरे (वय ६२, रा. नारायणगाव) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ व्यक्तीचे नाव आहे. तर कारमधील रोहित विजय डेरे (वय २३), उज्ज्वला विजय डेरे (वय ४८), मोहित विजय डेरे (वय ३०), सविता अनिल शेटे (वय ४८), शैला दिलीप वारुळे (वय ५८), विनायक शिवाजी डेरे (वय ५०, सर्व रा. नारायणगाव) तसेच शोभा दशरथ वायाळ (वय ५४, रा. नांदुर, नाशिक ) यांच्यासह रस्ता ओलांडणारी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय १२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय डेरे हे कुटुंबासोबत नारायणगाव येथे राहतात. डेरे कुटुंब हे नाशिक येथून अस्थी विसर्जन करून आपल्या नारायणगाव येथील घरी परतत होते. त्याचवेळी डोळासणे येथील बांबळेवाडी शिवारात वैष्णवी मेंगाळ ही चिमुकली रस्त्याच्या दुभाजकातून अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागली.
चालक असलेल्या विनायक डेरे यांच्या लक्षात आले. त्यानंतर विनायक डेरे यांनी त्या चिमुकलीला वाचवण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. वेग असल्याने ही कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला महामार्गाच्या खाली जाऊन थांबली.
दरम्यान, या अपघातात विजय डेरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकलीसह आठ जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर झाला आहे.