भोर : पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील किकवी गावच्या हद्दीत विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील किकवी येथील हॉटेल प्रणव ते धांगवडी (ता. भोर) येथील हॉटेल सद्गुरू प्युअर व्हेज अशी दीड किलोमीटर अंतरापर्यंत भरधाव कारचालकाने कोणाच्याही जीवाची पर्वा न करता दुचाकील फरफटत नेल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २२) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार पांडुरंग किसन मोरे आणि कोमल पांडुरंग मोरे (दोघेही रा. मोरवाडी, ता. भोर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर पांडुरंग मोरे हे दुचाकीने प्रवास करत होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाची चारचाकी स्विफ्टने भरधाव वेगात मागून येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी समोरील बोनेटला ही दुचाकी अडकली. यावेळी पांडुरंग मोरे आणि कोमल मोरे हे दोघेही खाली कोसळले. त्यानंतर आरोपी कारचालकाने आपली कार न थांबवता दुचाकीला तसेच फरफटत तब्बल दीड किलोमीटर पर्यंत नेले.
या घटनेत पांडुरंग मोरे आणि कोमल मोरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आणि राजगड पोलिसांनी नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, ही बाब अनेक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी त्यांनी करचालकाला रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने कुठेही लक्ष न देता त्याचे कार भरधाव वेगाने दुचाकीसह दीड किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यावेळी प्रवासी आणि राजगड पोलिसांनी कारचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र करचालकाने कार दीड किलोमीटर नंतर महामार्गावर उभी करून पळून गेला. या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.