पुणे : हल्ली पहावं तिकडे व्हॉट्सअॅपचा बोलबाला आहे. या माध्यमाने सर्वांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहेच. मात्र, व्हॉट्सअॅपच्या फायद्याप्रमाणेच तोटेही समोर येत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चर्चा, रिप्लाय या कारणांवरून हिंसा वाढल्याची उदाहरणे वाढत आहेत. याचा प्रत्यय नुकताच पुणेकरांना आला. कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढलं, म्हणून एका कर्मचाऱ्याने चक्क त्याच्या बॉसला बांबूच्या साह्याने बेदम मारहाण केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार १ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान चंदननगरमध्ये जुना मुंढवा रोड परिसरात घडला.
या प्रकरणी लोहगावच्या खांडवा नगर परिसरातील अमोल शेशराव ढोबळे (वय ३१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सत्यम सिंघवी नावाच्या व्यक्तीविरोधात त्यांनी मारहाणीची तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हॉट्सअॅपने सर्वांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सोपा केला आहे. कितीतरी लोकांना या माध्यमाने एकत्र आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे या प्रभावी माध्यमाचा वापर मोठमोठ्या कंपन्या, ऑफिसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. या प्रकरणात सत्यम सिंघवी हा इन्स्टा गो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरी करत होता. ही कंपीन अमोल ढोबळे यांच्या मालकीची आहे. सिंघवी याच्याविरोधात अनेक ग्राहकांनी ढोबळेंकडे तक्रार केली होती. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाने सिंघवी याच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, सिंघवीने त्याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतप्त होऊन ढोबळे यांनी सिंघवीला ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून काढून टाकले.
दरम्यान, या प्रकारामुळे सिंघवी संतप्त झाला. ग्रुपमधून का काढले, असा जाब विचारत सिंघवी याने थेट ऑफिसमधील ढोबळे यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. हातातील बांबूच्या काठीने त्याने ढोबळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ढोबळे यांच्या आयफोनचेही नुकसान केले. या प्रकारानंतर ढोबळे यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सिंघवी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.